ताई माई आक्का …विचार करा पक्का !

Spread the love

डिजिटल डेस्क : काही वर्षांपुर्वीचे दिवस आठवा…ताई माई अक्का, विचार करा पक्का.. असं पुकारत पॉप्लेट वाटणारी जीप किंवा रिक्षा चौकाचौकातुन फिरू लागली कि निवडणुका आल्याची वातावरण निर्मिती व्हायची. पुकारणारी जीप पुढच्या चौकात गेली की मागच्या चौकात लगेच कोण निवडणुक जिंकणार, याची चर्चा रंगायची. हातातल्या तंबाखुला चुना लावत, निवडणुकीत गावातला कुठला
टग्या कार्यकर्ता कुठल्या नेत्याला चुना लावणार, याचीही चर्चा रंगायची. ज्या दिवशी एखाद्या मोठया नेत्याची सभा असायची, त्या दिवशी तर अशा पुकारणा-या जीप किंवा रिक्षा एकमेकाला थटायच्या. याच्या जोडीला रंगवलेल्या भिंतीही असायच्या. याच्या खुणा आजही ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणच्या मातीच्या भिंतीवर दिसुन येतात.

मतदानाची तारीख जशी जवळ येईल तसा निवडणुकीचा ज्वर वाढतच जायचा. मग रिक्षातल्या पॉम्प्लेटनंतर यायचा तो जाहिरनामा, झेंडे आणि बिल्ले. ज्याला पार्टीकडुन मलिदा मिळालाय, त्याच्याच घरावर झेंडा दिसायचा. बाकी बिल्ले घेण्यासाठी पोरांची झुंबड उडायची. कोणती पार्टी आणि कोण उमेदवार, याच्याशी त्यांचे काही घेणे देणे नसायचे. पण नेत्यांपेक्षा अधिक बच्चेकंपनीच या निवडणुकीच्या रंगात रंगुन जायची. गावपातळीवर हेच वातावरण असायचे. बाकी कोणत्या पक्षाने काय केले, काय दिले, पुढे काय देणार, याची चर्चा फक्त तथाकथित विदवानांपुरतीच मर्यादित.


ते भारतातील निवडणुकीचे अगदी सुरवातीचे दिवस होते. भिंतीवर जाहिरात व्हायची, त्यातला कंटेन अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असायचा. पक्ष, उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि शेवटी प्रचंड मतांनी विजयी करा..बस्स. जीप आणि रिक्षावरही पुकारणारी माणसे ठरलेली असायची. ती कला त्यांनाच जमायची. पुकारत पुकारत ती पॉम्प्लेट वाटण्याचेही काम करायची. ते करत असलेल्या जाहिरातबाजीसाठी कोणतेही स्क्रीप्ट नसायचे. माईक हातात आला की त्यांची स्क्रीप्ट आपोआप तयार व्हायची आणि बाहेर पडायची. यात पक्षाचे नाव, उमेदवाराचे नाव, चिन्ह याचा पंच वारंवार असायचा. आणि त्याकाळातली प्रचंड लोकप्रिय घोषणा जी आजही वापरली जाते, ती म्हणजे ‘ताई माई अक्का, विचार करा पक्का…’ अतिशय परफेक्ट यमक, घरातल्या सर्व मतदार सदस्यांपर्यंत पोहोचणारं आवाहन आणि भारदस्त आवाज त्यावेळी सर्वांचेच लक्ष वेधुन घ्यायचा. अर्थात जाहिरातीचा एक प्रकार म्हणुन याला तोडच नव्हती. परंतु गंमत अशी की काही वेळेस अशी जाहिरातबाजी करणारे निवडणुक हरायचे आणि अशी जाहिरात करण्यासाठी पैसे नसणारे उमेदवार पडायचे. त्याची कारणे वेगळी आहेत. त्याची चर्चा यापुढे आपण करणारच आहोत. परंतु अजुनही निवडणुका आल्या की अशा प्रकारच्या प्रचाराच्या आठवणी हा काळ पाहिलेल्यांच्या डोळयासमोर उभ्या राहतात, त्या केवळ या जाहिरातीच्या वेगळेपणामुळेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *