पासष्ठावी कला

Spread the love

पासष्ठावी कला

आज जिथं जागा मिळेल तिथं जाहिरात केली जात आहे. पेपर, पोस्टर्स, होर्डींग यानंतर टीव्ही, वेबसाईट, मोबाईलमध्ये जागा मिळेल तिथं जाहिरात होताना दिसत आहे. इतकचं नव्हे तर मध्यंतरीच्या काळात अगदी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापरही यासाठी केला गेला. आज तर मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरणा-यांवर जाहिरातींचा अगदी भडीमार सुरू आहे. एखादी माहिती पोहोचवण्यासाठी जाहिरातीचा वापर करण्यात येत होता. त्यानंतर उत्पादनांच्या विक्रीसाठी जाहीरातीचा मोठया प्रमाणावर वापर झाला. आता तर निवडणुका जिंकण्यासाठी प्रचाराचे हेच प्रभावी माध्यम ठरले आहे. जाहिरात कलेला पासष्ठावी कला म्हणुन संबोधलं जातं.

तसं पाहिलं तर या पासष्ठाव्या कलेला कोणत्याही क्षेत्राचं वावडं नाही. अगदी हरवलेल्या कुत्र्याला घरी परत येण्यासाठी आवाहन करणा-याही जाहिराती आपण पाहिल्या आहेत. आज या क्षेत्रात प्रचंड बदल झाला आहे. प्रत्येक क्षेत्राला आता पासष्ठाव्या कलेची गरज भासु लागली आहे. किंबहुना अनेक उत्पादने, व्यक्ती, कंपन्या, संस्था, राजकीय पक्ष याच कलेच्या आधारावर आपला उत्कर्ष साधत आहेत.


आज अनेक क्षेत्रं आपलं करीयर करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या तुलनेत हे क्षेत्र अगदीच वेगळं आणि आव्हानात्मक आहे. यात केवळ कला असुन चालत नाही तर सर्वात प्रथम आवश्यक असते ती कल्पकता. कोणत्याही जाहिरातीचा प्रवास इथुन सुरू होतो. त्यानंतर आर्टीस्ट किंवा त्यानंतरचे सर्व घटक समन्वय साधत या जाहिरातीला आकार देत असतात. त्यामुळं ज्यांच्याकडं कला, कल्पकता किंवा एखादी बाब विकण्याचं कौशल्य आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात भरपुर संधी आहेत.


फ्रेंच राज्य क्रांतीनंतर मोठया प्रमाणावर सामाजिक बदल झाले. औद्योगिक क्रांती झाली. नवनवीन उत्पादने येवु लागली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अनेक नव्या जाणीवा निर्माण झाल्या. नवनवीन उत्पादने तयार होवु लागली. त्याची माहिती ग्राहकांपर्यत पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातुनच जाहिरातीचा जन्म झाला. भारतातल्या पहिल्या जाहिरात एजन्सीचा जन्म 1902 साली मुंबईत झाला. बी दत्ताराम आणि कंपनी असं त्यांचं नाव.
जाहिरात क्षेत्राचा इतिहास आणि त्यात होत गेलेली स्थित्यंतरे याची माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेणारच आहोत, परंतु आमच्या माध्यमातुन या क्षेत्रातल्या अनेक चांगल्या घटना, घडामोडी आणि बातम्या आम्ही या माध्यमातुन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जेणेकरून नव्या पिढीला या क्षेत्रात करीयर करण्यासाठी अनेक संधी निर्माण करता येतील.

मुलाचा जन्म होतो. त्यावेळी त्याची कुंडली तयार केली जाते, याच पध्दतीने आपल्या ग्राहकाची अशी कुंडली तयार करण्याचे काम जाहिरात एजन्सी करत असते. हाच एक अनोखा प्रवास आपण आमच्या पासष्ठावी कला या विशेष सदरातुन अनुभवणार आहोत.