से नो टू प्लास्टिक बॉटल !

Spread the love

डिजिटल डेस्क : पर्यावरण आणि आपले आरोग्य याचा विचार करून सध्या ‘नो प्लास्टिक’ मोहिम राबवली जात जात आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या मधून पाणी पिणे आरोग्यास हानिकारक असते. त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या आता बदलण्याची वेळ आली आहे. पाणी पिण्यासाठी आणखी कोणते पर्याय आहेत, याची माहिती जाणून घेऊया.

मातीची बॉटल
प्लास्टिकच्या कोणत्याही कंटेनरमधल्या पाण्यापेक्षा गारेगार माठातलं पाणी केव्हाही उत्तमच असतं. तसंच प्लास्टिकच्या बाटलीलाही मातीची बाटली हा पर्याय होऊ शकेल. अशी बॉटल फ्रिज मध्ये ठेवण्याची गरज नाही. मातीच्या भाड्यातलं पाणी प्यायल्याने शरीरातलं टॉक्सिन बाहेर निघायला मदत होते. पचन क्रिया सुधारते. गॅस, अपचन सारखे विकार होत नाही.

तांब्याच्या बाटल्या
कॉपर किंवा तांब्याच्या बाटल्या खरेदी करण्याकडे आजकाल कल वाढत आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रणात राहणे, जंतुसंसर्ग न होणे असे अनेक फायदे आहेत. पण तुम्ही खऱ्या तांब्याची बाटली घेतलीय की ती वरवर तांब्या सारखी दिसतेय हेही जरूर पहा.

स्टेनलेस स्टील बॉटल
सध्या बाजारात स्टेनलेस स्टीलच्या बॉटल्सही पाहायला मिळतात. या बॉटल्स अशा बनवल्या जात की त्यात पाणी किंवा कोणतंही लिक्विड टाकल्यास त्याचा वास किंवा मेटलची टेस्ट येत नाही. ही बॉटल पूर्णपणे सुरक्षित असते. त्यात पाणीही खूप वेळपर्यंत थंड राहते.

काचेची बाटली
काच हा देखील प्लास्टिकला एक उत्तम पर्याय आहे. ही बॉटल हाताळताना फार काळजी घ्यावी लागते. घरात काचेची बॉटल वापरू शकता, पण ती सांभाळणे जिकिरीचे असते. त्यावरही उपाय म्हणून हल्ली अशा काचेच्या बॉटल्स संरक्षक कापडी आच्छादनात येतात. काचेच्या बाटलीत पाणी किंवा कोणत्याही लिक्विडची मूळ चव जशीच्या तशीच राहाते.

सिरॅमिक बॉटल्स
काचेप्रमाणेच सिरमिक बॉटल्स देखील उत्तम. मात्र त्याही फुटण्याची भीती असल्याने रोजच्या वापरासाठी थोड्या अडचणीच्या ठरतात. मात्र घरी किंवा ऑफिसमध्ये बॉटल ठेवून देणार असाल, तर सिरामिकची बॉटल वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *